Friday, 24 August 2012

सिक्वल्स मध्ये चांगला परंतु..




  १९९७ ला आलेला मेन इन ब्लेक एक विनोदी, काल्पनिक वर्गवारीत बसणारा मजेशीर परग्रहवासी असणारा सिनेमा होता. अशा वर्गवारीतील हा पहिल्या सिनेमांपैकी एक. वरून स्टीवन स्पीलबर्ग सारखा प्रोड्युसर विल स्मिथ, टॉमी ली जोन्ससारखे अभिनेते आणि मोठे बजेट असलेल्या या सिनेमाने बरीच उत्सुकता वाढवली. चांगली पटकथा, स्पेशल इफ्फेक्ट्स, नाविन्यपूर्ण प्रसंग या सगळ्या जमेच्या बाजू असल्याने सिनेमा लोकांच्या बऱ्यापैकी लक्षात राहिला. आणि हीच गोष्ट जी बऱ्याच सिक़्वलस च्या अपयशाला कारणीभूत ठरते, मेन इन ब्लेक २ (२००२) लाही मारक ठरली.


  मेन इन ब्लेक २ मध्ये पहिल्या भागाच्या जमेच्या बाजू असूनही तो कुठेतरी कमी पडला. असे म्हणायचे कारण म्हणजे तो कुठेतरी जास्त असण्याची अपेक्षा चाहते करत होते. २रा भाग काहीच नवीन न देऊ शकल्याने जरा जास्त चांगले एफ्फेक्ट्स असूनही तो लक्षात राहील अशी काही कमाल करू शकला नाही ज्याची प्रत्येक नाविन्यपूर्ण आणि हिट सिनेमाच्या पुढच्या भागांकडून अपेक्षा असते. तिसरा भाग नाही म्हटले तरी दुसऱ्या भागापेक्षा बराच सरस आहे. परंतु तरीही तो पहिल्या भागाइतका सरस नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही जर पहिला आणि दुसरा भाग पहिला नसेल तर मेन इन ब्लेक ३ खूप आवडेल आणि नंतर पहिला भाग पाहिलात तर तो प्रचंड आवडेल. पहिल्या भागातील परग्रहरवासीयांवर लक्ष ठेवणारी संघटना अशी भन्नाट संकल्पना घेऊन लेखकांनी जी कमाल केली ती दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात अभावाने दिसली. फार हुशारीने रोवलेले विनोदी आणि गंभीर प्रसंग एजेंट जे आणि एजेंट के ची जोडी स्मरणीय करून गेले.


  मेन इन ब्लेक ३ मध्ये पहिल्या भागाच्या जमेच्या बाजू असूनही संकल्पना जुनीच असून आधीच्या भागांना साजेश्या समान गोष्टी परत पाहायला मिळतात. परंतु पृथ्वी संकटात पडूनही आणि एजेंट के भूतकाळात मारला गेल्यामुळे अचानक इतिहासातून गायब होऊनही जी धम्माल आपल्याला एजेंट जे कडून अपेक्षित असते ती काही प्रमाणात कमी पडते. जमेच्या नवीन बाजू म्हणजे भूतकाळातील तरुण एजेंट के साकारलेल्या जॉश ब्रोलीनचा अभिनय. फार कमी चित्रपटांमध्ये एकाच पात्राच्या दोन वेगळ्या वयोगटात वेगळ्या अभिनेत्यांनी साकारलेल्या भूमिका इतक्या विश्वसनीयरित्या सारख्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एजेंट असूनही के ला माहित नसलेली गोष्ट शेवटी उलगडते तेव्हा दोन्ही एजेंटच्या नात्याचा वेगळाच पैलू समोर येतो.


  नाविन्यपूर्ण पटकथा नसल्याने पहिल्या भागाइतका संस्मरणीय नसला तरीही ३डी च्या आणि हिंदी भाषेतील विशिष्ठ अशा विनोदी डबिंग शैलीच्या चाहत्यांसाठी हा एक चांगला विरंगुळा आहे.
-          अमेय अनंत बेनारे.
................

Monday, 20 August 2012

एक्शन प्याक्ड बॉलीवूड २०११



   मागील वर्षी बॉलीवूडचा रथ चांगलाच उधळलाय. मुख्यत्वे  एक्शन आणि विनोदी या क्षेत्रांमध्ये चांगलीच घोडदौड झालीये. त्याचप्रमाणे साय-फाय, प्रौढ विनोदी अशी काहीशी नवीन क्षेत्रदेखील पादाक्रांत केली गेली. बाकी रोमांचक आणि सामाजिक सिनेमांचा वरचेवर पगडा होताच. पण खरे वर्चस्व राहिले ते विनोदी मारधाडपतांचे. सलमानचे बोडी गार्ड, रेडी आणि अजय देवगणचा सिंघम हे या वर्षीच्या हिट सिनेमांच्या मुकुटातील मानाचे तुरे. तसेच जिंदगी ना मिलेगी दोबारा, मेरे ब्रदर कि दुल्हन, यमला पगला दिवाना, तनु वेडस मनु हीदेखील या वर्षीची ठळक विनोदी वैशिष्ठ.

 
    हिट सिनेमांमध्ये मागील वर्षी २ एकदम विरुद्ध प्रवाह पाहायला मिळाले. एक काळानुरूप जाणारा ज्यात रा.वन हा तांत्रिक गोष्टीमध्ये अद्ययावत आहे तसेच दिल्ली बेली हा प्रौढ आणि भन्नाट विनोदी ज्या प्रकारची हॉलीवूड मध्ये बरीच चलती आहे तर दुसरा काळाच्या मागे जाऊन विनोदी आणि मारधाडपतांचे जुने फोर्म्युले परत यशस्वी करून दाखवणारा. दोन्हींनी  भरगोस यश मिळवलय.
 



    २०११ची एकदम कडक सुरुवात केली ती नो वन किल्ल्ड जेसिका ने. राणी मुखर्जीची जबरदस्त भूमिका असलेला या सत्य घटनेवर आधारित सामाजिक रोमांचक ड्रामाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यमला पगला दिवाना आणि दिल तोः बच्चा है जी ने चांगली विनोदी सुरुवात केली. मधेच किरण रावचा धोबी घाट मुंबईचे आंबट कडवट सत्य सांगून गेला. पटियाला हाउस आणि तनु वेडस मनु यांनी आपली उपस्थिती नोंदवली.




    सुट्ट्यांच्या मोसमात काही नवीन प्रकारचे सिनेमे आले. ४०४ हा राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या निशिकांत कामातची प्रमुख भूमिका असलेला मानसशास्त्रीय रोमांचक प्रकारातला चांगला सिनेमा. पण तो कधी आला कधी गेला कळलाच नाही. तुषार कपूरचा शोर इन द सिटी सुद्धा एक चांगला प्रयोग होता. पण त्यातील बावरो गाण्याइतका काही तो हिट झाला नाही. हॉन्तेड ३ डी हॉरर असूनही काही कमाल करू शकला नाही. त्यामुळे गरमीच्या सुट्ट्या थोड्या थंडच गेल्या. त्यात झोकोमोन, स्तान्ली हे काही लहान मुलांसाठी चित्रपट आले त्यातील स्तान्ली का डब्बा हा अमोल गुप्ते आणि त्याचा मुलगा पार्थो यांच्या अभिनयाने नटलेला हृदयस्पर्शी चित्रपट सर्वांनी नक्की पहावाच या प्रकारातला होता. हॉलीवूडच्या अक्सेप्तेड सिनेमावर बेतलेला फालतू ने  बर्यापैकी यश मिळवलं. बाकी गेम, थांक यु, दम मारो दम हे बिग बजेट सिनेमे आले आणि गेले.




    खरी धमाल आली ती वर्षाच्या उत्तरार्धात. जूनच्या सुरुवातीलाच आलेल्या सलमान खानच्या रेडीने. कलाकारांची गर्दी आणि कंटाळवाण्या पूर्वार्ध असूनही कारेक्टेर ढिल्या सलमानची जादू बॉक्स ऑफिस वर धींका चिका करून गेली. सलमानचा हा १०० करोडच्या वर कमावणारा लागोपाठ दुसरा आणि आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा बॉलीवूडच्या ४था चित्रपट ठरला.
 



    बॉलीवूडला नवीन असे कमरेखालचे विनोद, वेड्यासारखे हसायला लावणारे किस्से आणि आजच्या दिल्लीच्या तरुणांच्या डी के बोस संस्कृतीचे प्रदर्शन असलेला फक्त १८ ते ३५ वयोगटातील लोकांसाठी बनवण्यात आलेला आमीर खान चा धाडसी आणि यशस्वी प्रयत्न दिल्ली बेलीने बॉलीवूडला वेगळीच वाट दाखवली.
 



    झीन्दागी ना मिलेगी दोबारा हा भाऊ फरहान अख्तरच्या दिल चाहता है चा झोया अख्तर वर्जन. अभिनेत्यापासून लोकेशन्स आणि गाण्यांपर्यंत सर्वच बाबतीत हा सिनेमा अतिशय सुंदर. त्याउलट शैतानने परत एकदा आजच्या बेफिकीर तरुणाईची रोमहर्षक कथा दाखवून गंभीर केले. मिलन लुथारीयाच्या डर्टी पिक्चरने सिल्क स्मिथचा जमाना दाखवला. मुलींसाठी तितकासा पहाणेबल नसलेला हा सिनेमा विद्या बालनला भविष्यात बरेच आव्हानात्मक भूमिका आणून देणार हे नक्की. मेरे ब्रदर कि दुल्हन मध्ये इम्रान ची जादू म्हणावी तितकी चालली नाही पण कतरिना ने मात्र धमाल उडवली. अली जफरही बर्यापैकीच होता.
 



    आपल्या निशिकांत कामतचा फोर्स हा एक खरा गंभीर मारधाडपात होता. जॉन आणि विद्युतला एकमेकांच्या विरोधात लढताना पाहणे म्हणजे डोळ्यांना ट्रीट होती. तसाच १९ मराठी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिंघम रोहित शेट्टीला आपला करून गेला. 


  उत्तर भारतात सुरुवातीला तितकासा चांगला प्रतिसाद न मिलेल्या सिंघमची नन्तर जी सटकली ती सटकलीच. क्लास ते मास, लहानथोर आणि सर्व ठरतील लोकांना आवडलेला सिंघम पाहून इंडस्ट्रीला कळलं कि 'आली रे आली, आता रोहित शेट्टी ची पाळी आली'. तसाच ऑगस्ट दरम्यान आलेला सलमान करीनाचा बोडी गार्ड फक्त अक्शन आणि सलमानच्या जीवावर बॉलीवूडचा या वर्षीचा सर्वात मोठा हिट ठरला. पहिल्याच दिवशी २१  करोड पेक्षा जास्त कमावणारा हा चित्रपट बॉलीवूडचा आतापर्यंतचा दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आणि सलमान खरा बॉलीवूड गार्ड.



    पंकज कपूरचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न मौसम मात्र लोकांना फारच कांटाळवाना होता. देसी बोय्ज ची पण सारखीच गत. सेक्सी जॉन कॉमेडी अक्षय आणि हॉट दीपिकाही या बोल्ड सिनेमाला तारू शकले नाही. विशाल भारद्वाजच्या ७ खून माफनेही खाशी कमाल  केली नाही. प्रकाश झा चा आरक्षण मात्र फार मोठा अपेक्षाभंग ठरला. उत्तम स्टार कास्ट, चांगला विषय, मधाळ गाणी असूनही व्यवस्थित मांडणी नसल्याने प्रेक्षकांना आरक्षित करणे जिकरीचे झाले. मध्यंतरी साऊंड ट्राक आणि गर्ल इन याल्लो बूट्स असे काही अयशस्वी पण चांगले प्रयत्न झाले.
 


    मग दिवाळीत आला रा.वन. शाहरुखचा ड्रीम प्रोजेक्ट. त्याने स्वतःने इतका झोकून दिलेला या प्रोजेक्टमध्ये कि तो डब्यात जाणे शक्यच नव्हते. यत्र तत्र सर्वत्र रावणमय वातावरणात दिवाळी साजरी झाली. क्लासला आवडती असे अद्ययावत स्पेशल इफ्फेक्ट्स, अकोन ची गाणी आणि मासला आवडतील अशी सोप्पी गोष्ट आणि छम्मक छाल्लो करीना असा सगळा सरंजाम करताना सिनेमाचा बजेट आकाशाला भिडलं. नशिबाने कलेक्शनही..



    रॉक स्टार हे एक या वर्षीचा ठळक वैशिष्ठ. लव आज कल पासून इम्तियाझ अलीची हिरोईनची निवड चुकत असली तरी बाकी बाबतीत तो आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्याच्या मागे लागलाय खरा. रणबीरचा सहज सुंदर अभिनय, इम्तियाझची गोष्ट सांगण्याची पद्धत, भूमिकेतील बारीक निरीक्षण या रॉक स्टार च्या जमेच्या बाजू. नर्गिस जितकी सुंदर आहे तितका सुंदर आणि रणबीरच्या अभिनयाला साजेसा अभिनय आणि रेहमानची त्याच्या कीर्तीला साजेशी गाणी या गोष्टीची कमतरता भासली.
    अजून एक कमी राहून राहून भासली ती आमीर खानची. पण त्याने पडद्यामागे चांगलीच गाजवली हेही खरच. दिल्ली बेलीसारखे धाडस आमीरच जाणो. आणि धोबी घाट, मधला कलाकारही तेवढाच सुखावह होता. एकता कपूरनेही या वर्षी रागिणी एम एम एस, शोर इन द सिटी आणि द डर्टी पिक्चरद्वारे फिल्म इंडस्ट्रीत व्यवस्थित रोवलेत.
    जलेबी बाई पासून उ ला ला विद्या पर्यंत आयटम सोन्ग्स डोळ्यांचे पारणे फेडायला याही वर्षीहि सज्ज होतेच. सध्या कोंबडी पळालीचा हिंदी तडका चिकणी चमेली वर्षाखेर चांगलाच गाजवतोय आणि अजय अतुल यांनाही.
    २०११ च्या पूर्वार्धात हळू हळू उंचावर पोहोचलेला सिनेमाच्या रोलर कोस्टरने जो सूर मारलाय तो पाहून ही राईड २०१२ मध्येही उत्तरार्धात अधिक रोमहर्षक होईल अशी अपेक्षा आहे.