Wednesday, 8 August 2012

प्रभावशाली सिनेमा



  सिनेमांचा समाजावरील प्रभाव आपल्याला सर्वत्र जाणवतो. आपल्या वागण्या बोलण्यात, पेहरावात, आवडीनिवडीमध्ये, अगदी प्रपोज करण्याच्या पद्धतीत सर्वत्र हा सिने-प्रभाव आपल्यावर दिसतो. क्रिश बघून आलेला एखादा लहान मुलगा रात्री आईबाबांना झोपेत लाथा मारतो तेव्हा या सिनेसृष्टीच्या प्रभावाचे कौतुक वाटते. परंतु हाच प्रभाव जेव्हा खूप जास्त प्रमाणात होतो तेव्हा..


  काही उत्कृष्ठ सिनेमांच्या उत्कट कथानक आणि सादरीकरणामुळे एकूणच त्या सिनेमाच्या प्रभावशाली नाविन्यामुळे काही लोकांवर त्या सिनेमातील विचारांचा जबरदस्त पगडा बसतो आणि मग ते खरोखरचे जग आणि सिनेमाचे विश्व याट गल्लत करून बसतात. अशीच गल्लत हल्लीच कोलोराडो येथे बघायला मिळाली. डार्क नाईट रायजेस या सिनेमाचा एक व्यक्तीवर इतका प्रभाव झाला की त्याने चाक जाऊन त्या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी कोलाराडोमधील थिएटरबाहेर चक्क गोळीबार केला. त्या बरीच जीवहानी झाली. सिनेमावरील असे प्रभाव मागील बऱ्याच दशकांपासून पाहायला मिळत आहेत.


  आत्ताच्या क्रिस नोलान पासून स्टीवन स्पीलबर्गपऱ्यांच्या सगळ्या सर्वोत्तम दिग्दर्शकांचा आवडता स्तानली कुब्रिक याने १९७१ ला क्लॉकवर्क ऑरेंज नावाचा सिनेमा बनवला तो तिकडे प्रदर्शित करण्यास मनाई होती इतकी हिंसा, प्रणयदृश्ये इत्यादी गोष्टींचा भडीमार त्यात होता. या सिनेमाने आजच्या मोठ्या दिग्दर्शकाना मात्र वेगळीच वाट दाखवली. परंतु त्यावेळी मात्र या सिनेमाने तरुणांमध्ये भयानक अपराध करण्याची इच्छा निर्माण केलेली. पोर्न सिनेमा म्हटला गेलेल्या या सिनेमावारची बंदी २००० साली उठली आणि त्याधीच १९९९ ला स्तानली जग सोडून गेले.


  १९९९ साली हॉलीवूडने बरेच जबरदस्त सिनेमे दिले त्यातील एक म्हणजे मेट्रिक्स. या सिनेमात आपण जगत असलेलं हे जग अस्तित्वातच नसून तो खर तर आपल्या डोक्यात भरून दिलेला एक कॉम्प्युटर मध्ये भरतात तसा प्रोग्राम आहे असे दाखवलेले. या सिनेमाने काही तरुणांना इतके प्रभावित केले की त्यातील एकाची तर आपल्या पालकांना जीवे मारून रस्त्यावर दिसेल त्याला मारत सुटण्यापर्यंत मजल गेली. पोलिसांनी पकडल्यावरही ते जणू मेट्रिक्स सिनेमातील विलनच आहेत असा त्याचा समाज झालेला.


  ९९ मध्येच आलेला फाईट क्लबची तर बातच और आहे. जगातील आताचे सर्वोत्कृष्ठ लेखकांपैकी एकाच्या पुस्तकावर आधारित असेलेली कथा, डेविड फिंचर सारखा दिग्दर्शक, ब्रेड पिट सारखा तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला आणि एडवर्ड नॉर्टन सारखा उमदा अभिनेता आणि सगळ्याच गोष्टींमध्ये हा सिनेमा इतका उत्कृष्ठ आणि वेगळा तरीही विश्वसनीय आहे की याचा समाजावर प्रभाव न होणे शक्यच नव्हते. या सिनेमानंतर परदेशात बरेच अनधिकृत फाईट क्लब सुरु झाले. तरुण एकमेकांना सिनेमातील उत्क्रांतीवादी पण स्टायलिश विचारांमुळे बदडू लागली. हा सिनेमा ज्या पुस्तकावर बेतलाय ते चक पालहूनिक याचे पहिले पुस्तक ज्याच्या हल्लीच दहाव्या का अकराव्या पुस्तकाचे वाचन चालू असताना तब्बल २०० लोकं बेशुद्ध झाली. 


  या उदाहरणावरून असे वाटेल की सिनेमांचा प्रभाव फक्त उथळ विचारांची लोकच घेतात परंतु तसे नाहीये. मागील दशकात झालेल्या बऱ्याच वैज्ञानिक शोधांच्या मूळ कल्पना या साय फाय सिनेमातून घेतलेल्या आहेत. मायनोरिटी रिपोर्ट सारख्या सिनेमातील छोटे रोबोट्स ची कल्पना आणि डिजाईन संकल्पना वापरून वैज्ञानिक भूकंपात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणारे रोबोट्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.


  सिनेमाचा सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक पातळीवर असा जबदरस्त प्रभाव पडतो. चांगला असो किंवा वाईट पण तो खूप जास्त प्रमाणात आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर पाहायला मिळतो. या प्रभावाची ताकद एखाद्या सिनेनिर्मात्याने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि एका निश्चित उद्देशाकडे तिला जर तो वळवू शकला तर ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक समस्येवरही मात करता येईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


  आपल्याकडेही असे बरेच किस्से झाले असतील. आठवतोय का, एखादा भन्नाट वाला किस्सा खाली कमेंटमध्ये टाकण्यासारखा...

No comments:

Post a Comment