Friday, 24 August 2012

सिक्वल्स मध्ये चांगला परंतु..




  १९९७ ला आलेला मेन इन ब्लेक एक विनोदी, काल्पनिक वर्गवारीत बसणारा मजेशीर परग्रहवासी असणारा सिनेमा होता. अशा वर्गवारीतील हा पहिल्या सिनेमांपैकी एक. वरून स्टीवन स्पीलबर्ग सारखा प्रोड्युसर विल स्मिथ, टॉमी ली जोन्ससारखे अभिनेते आणि मोठे बजेट असलेल्या या सिनेमाने बरीच उत्सुकता वाढवली. चांगली पटकथा, स्पेशल इफ्फेक्ट्स, नाविन्यपूर्ण प्रसंग या सगळ्या जमेच्या बाजू असल्याने सिनेमा लोकांच्या बऱ्यापैकी लक्षात राहिला. आणि हीच गोष्ट जी बऱ्याच सिक़्वलस च्या अपयशाला कारणीभूत ठरते, मेन इन ब्लेक २ (२००२) लाही मारक ठरली.


  मेन इन ब्लेक २ मध्ये पहिल्या भागाच्या जमेच्या बाजू असूनही तो कुठेतरी कमी पडला. असे म्हणायचे कारण म्हणजे तो कुठेतरी जास्त असण्याची अपेक्षा चाहते करत होते. २रा भाग काहीच नवीन न देऊ शकल्याने जरा जास्त चांगले एफ्फेक्ट्स असूनही तो लक्षात राहील अशी काही कमाल करू शकला नाही ज्याची प्रत्येक नाविन्यपूर्ण आणि हिट सिनेमाच्या पुढच्या भागांकडून अपेक्षा असते. तिसरा भाग नाही म्हटले तरी दुसऱ्या भागापेक्षा बराच सरस आहे. परंतु तरीही तो पहिल्या भागाइतका सरस नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही जर पहिला आणि दुसरा भाग पहिला नसेल तर मेन इन ब्लेक ३ खूप आवडेल आणि नंतर पहिला भाग पाहिलात तर तो प्रचंड आवडेल. पहिल्या भागातील परग्रहरवासीयांवर लक्ष ठेवणारी संघटना अशी भन्नाट संकल्पना घेऊन लेखकांनी जी कमाल केली ती दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात अभावाने दिसली. फार हुशारीने रोवलेले विनोदी आणि गंभीर प्रसंग एजेंट जे आणि एजेंट के ची जोडी स्मरणीय करून गेले.


  मेन इन ब्लेक ३ मध्ये पहिल्या भागाच्या जमेच्या बाजू असूनही संकल्पना जुनीच असून आधीच्या भागांना साजेश्या समान गोष्टी परत पाहायला मिळतात. परंतु पृथ्वी संकटात पडूनही आणि एजेंट के भूतकाळात मारला गेल्यामुळे अचानक इतिहासातून गायब होऊनही जी धम्माल आपल्याला एजेंट जे कडून अपेक्षित असते ती काही प्रमाणात कमी पडते. जमेच्या नवीन बाजू म्हणजे भूतकाळातील तरुण एजेंट के साकारलेल्या जॉश ब्रोलीनचा अभिनय. फार कमी चित्रपटांमध्ये एकाच पात्राच्या दोन वेगळ्या वयोगटात वेगळ्या अभिनेत्यांनी साकारलेल्या भूमिका इतक्या विश्वसनीयरित्या सारख्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एजेंट असूनही के ला माहित नसलेली गोष्ट शेवटी उलगडते तेव्हा दोन्ही एजेंटच्या नात्याचा वेगळाच पैलू समोर येतो.


  नाविन्यपूर्ण पटकथा नसल्याने पहिल्या भागाइतका संस्मरणीय नसला तरीही ३डी च्या आणि हिंदी भाषेतील विशिष्ठ अशा विनोदी डबिंग शैलीच्या चाहत्यांसाठी हा एक चांगला विरंगुळा आहे.
-          अमेय अनंत बेनारे.
................

No comments:

Post a Comment