Tuesday, 11 September 2012

अद्भूत प्रोमीथीयस




  दिग्दर्शक रिडली स्कॉटने एलियन (१९७९) द ब्लेड रनर (१९८२) सारखे सिनेमे बनवून हॉलीवूडच्या हॉरर सिनेमांची व्याख्या कायमची बदलून टाकली. ८०व्या दशकात परग्रहवासी ही संकल्पना घेऊन हॉरर वर्गातील सिनेमा काढून रिडली स्कॉटने जगभरात कीर्ती कमावली. नंतर मध्यंतरीच्या काळात त्याने बरेच इतर विषयांवरील आणि वर्गवारीतील सिनेमे बनवले जे बरेच हिट देखील झाले परंतु एलियनचे चाहते मात्र स्कॉट आता हॉरर सिनेमे बनवणार आहे की नाही या काळजीत पडलेले.


  या ८ जूनला तब्बल ३० वर्षांनी रिडली साय फाय हॉरर सिनेमा प्रोमीथीयस प्रदर्शित झाला. आणि बोनस म्हणजे हा सिनेमा एलियनचा पूर्वभाग आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीत एलियनच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणीच आहे. २१व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवजातीचा उगम शोधण्यासाठी पृथ्वीवरून परग्रहावर गेलेल्या एका गटाला पूर्ण मानवजात नष्ट होईल अशा काही गोष्टींचा सामना करावा लागतो अशी प्रोमीथीयसची भन्नाट कथा आहे. चार्ली थेरोन,  मायकल फेसबेंडर आणि काही तगडे अभिनेते या सिनेमात आहेत. पैकी मायकल फेसबेंडरची वेगळीच विशिष्ठ भूमिका त्याने छानपैकी निभावली आहे. 


  तरीही काही बाबींमध्ये हा सिनेमा अपेक्षाभंग करतो. प्रमुख कारण म्हणजे अविस्मरणीय एलियन सिनेमाबरोबर होणारी तुलना. ८०व्या दशकातील कमकुवत स्पेशल इफ्फेक्ट्सचाही अगदी योग्य वापर करून अभिनय आणि सिनेमा निर्मितीच्या इतर बाबींनी विश्वसनीय झालेला एलियन नंतर कित्येक जणांना प्रेरणा देईल इतकी स्वतःची सशक्त ओळख करून ठेवली आहे. त्यामुळे प्रोमीथीयस मध्ये एलियनमधील काही कायम लक्षात राहिलेल्या गोष्टींच्या आजच्या काळानुसार अभाव असणे अपेक्षितच होते. परंतु उत्कृष्ठ अभिनय, दृश्ये, चलचीत्रण, एलियनमध्ये फारच कमी असलेले परग्रहाची भन्नाट दृश्ये प्रोमीथीयसमध्ये सापडतात. एलियन सिनेमाप्रमाणे अपेक्षा न ठेवता हा सिनेमा पहिला तर तो नक्कीच लक्षात राहील असा आहे


...............

No comments:

Post a Comment