Thursday, 7 August 2014

टचवूड..स्पेशल इफेक्ट्स

   आताआताशा बॉलीवूडमध्ये स्पेशल इफेक्ट्सच्या वाटय़ाला जाण्याचं धाडस दिग्दर्शक करू लागले आहेत. ‘रा. वन’, ‘क्रिश’, ‘धूम ३’ असे तद्दन व्यावसायिक सिनेमे हिरोंच्या स्टाइलने चर्चेत राहिले खरे; पण यात महत्त्वाचे होते, ते म्हणजे स्पेशल इफेक्ट्स! हॉलीवूडमध्ये स्पेशल इफेक्ट्सचा दंगा दिसतो, पण आपल्याकडे ती मानसिकता अजून तयार झालेली नाही. जागतिक सिनेमाच्या स्पर्धेत आपल्याला आपलं घोडं दामटवायचं असेल तर स्पेशल इफेक्ट्सवर कमांड मिळवली पाहिजेच..  
avatar_high_resolution-wide 
नुकत्याच केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुण्याचे एफटीआयआय (फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑॅफ इंडिया)ला राष्ट्रीय पातळीची मान्यता देण्याची घोषणा केली.  फिल्मक्षेत्रातील हुशार आणि अव्वल विद्यार्थी म्हणून या विद्यापीठाकडे पाहिले जाते. शिक्षण देताना तांत्रिक बाबी घोटवून घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरू शकेल.
   सर्वच बाबतीत सुसाट वेगाने प्रगत होत चाललेलं बॉलीवूड जागतिक सिनेमाच्या रेसमध्ये कुठल्या एका भागात लक्षणीय रित्या मागे पडताना दिसतं, ते म्हणजे ‘स्पेशल इफेक्ट्स’. भारतीय सिनेसृष्टीत हे एक असे प्रांत आहे जिथे नक्कीच स्पेशल प्रोत्साहनाची गरज आहे.
   साधारण मी दुसरीला असेन. सिनेमामुळे पहिल्यांदा आईचा मार खाल्ला होता. दोन तास झाले आई मला शोधत होती, पण माझा काही पत्ताच नाही. झाले असे होते की माझ्या एका मित्राने मला त्याच्या घरी नेले. तिकडे त्याच्या माळ्यावर बऱ्याच मुलांचा घोळका आल्याचे पहिले. त्याच्या काकाने व्हीसीआरवर एक सिनेमा लावला होता. प्रिंट पायरेटेड होती. मला स्पष्ट आठवते. पण त्यावेळी काही कळत नव्हते आणि त्या स्पेशल क्षणी त्याची शक्यताही नव्हती. कारण तो सिनेमा होता ‘ज्युरासिक पार्क’. लक्षात घ्या की, १९९७ चा तो काळ होता. ‘शक्तिमान’ यायलाही अजून दोन वर्षे होती. हिंदी सिनेमाची ओळखच तशी ताजीताजी होती. कार्टून, व्हिडिओ गेम वगैरे प्रकार असतात, याची तेव्हा कल्पना नव्हती. अशावेळी तुमच्या समोर ज्युरासिक पार्क आला तर तुमची रिअ‍ॅक्शन काय असेल? डायनासोर खरेखुरे जिवंत आहेत का रे अजून अमेरिकेत? टीरेक्सने गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या मित्राला विचारले होते.
   ज्युरासिक पार्क या सिनेमाने माझ्या बालमनावर हॉलीवूडची जबरदस्त आणि पक्की नोंद करून टाकली होती. आज लक्षात येते की हे माझ्याच बाबतीत झाले नव्हते. स्टीव्हन स्पीलबर्ग नाव सिनेमाच्या इतिहासात कायमचे नोंदवायलाही हाच सिनेमा बऱ्यापैकी कारणीभूत होता. स्पेशल इफेक्टसच्या विश्वातही या सिनेमाने जादू करून टाकली.
  दिग्दर्शकाला आता सिनेमात अक्षरश: काहीही दाखवण्याची मुभा मिळालेली. स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत असे शोध या सिनेमाच्या विएफेक्स टीमने दिग्दर्शकाच्या कल्पकतेला बरोबर घेऊन लावले होते. आणि त्यानंतर हॉलीवूडने स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत जी कात टाकली आहे, ती आपल्या लकी जनरेशनलाच माहीत. लकी याकरिता की स्पेशल इफेक्ट्सचा इतिहास पाहिला तर तो आपल्या बॉलीवूडपेक्षाही जुना असल्याचे लक्षात येते. ज्युरासिक पार्क पाहून झाल्यावर माझ्या त्या मित्राच्या काकाने शंकानिरसन केले होते की, हे डायनासोर कम्प्युटरवर बनवलेले आहेत आणि आताच्या आपल्या जनरेशनची स्पेशल इफेक्ट्सशी तोंडओळखी साधारणत: इतकीच आहे. पण तसे नसून स्पेशल इफेक्ट्स इतके विकसित व्हायलाही जवळपास एक पूर्ण शतक लागले. मॉडेल मेकिंग, लायटिंग, ट्रिक फोटोग्राफी, स्टॉप मोशन, मोशन केप्चर अशा पुष्कळ स्टेजेसमध्ये हे होत गेले होते. मात्र टर्मिनेटर २, ज्युरासिक पार्क नंतर स्पेशल इफेक्ट्स इतके सुंदर झाले की खऱ्याखोटय़ातील (लाइफ साइज मॉडेल आणि कम्प्युटर ग्राफिक्स) अंतर सांगणे खूप कठीण होऊन गेले.
   पाश्चिमात्य संस्कृती, ऐतिहासिक किंवा भौगोलिक किंवा जी काही विशिष्ट कारणे असतील, त्यामुळे तांत्रिक बाबतीत पौर्वात्य देशांपेक्षा नेहमी पुढे राहिली आहेत. अभ्यासक वृत्तीमुळे आणि त्यास पोषक बाबींमुळे आधुनिकीकरणात नेहमीच पश्चिमेचा पुढाकार राहिला आहे. आपल्याकडील कम्प्युटर इंजिनीअर्सची डेव्हलपमेंट किंवा रिसर्चची कामे सोडून फक्त मेंटेनन्सचीच कामे
life_of_pi 
 मिळतात, या तक्रारीचे मूळही इथेच मिळते. साहजिकच ही तांत्रिक प्रगल्भता तिकडल्या कलाकारांना आकर्षित करू लागली. आणि तिकडच्या कलाही (आणि कलाकार) जगाच्या आधी प्रगत होऊ  लागल्या. फिल्म मेकिंग ही कलांमधील सर्वात जास्त तांत्रिक कला. म्हणूनच फिल्म निगेटिव्हच्या शोधापासून थ्रीडी सिनेमाच्या शोधापर्यंत सगळे शोध तिकडचेच. आपल्याकडे ते नेहमी नंतर आणले गेले.
  असे असले तरी ज्या काळात सिनेमे भारतात आले तेव्हाच्या आपल्या कठीण काळात सिनेमाने लोकांना तीन तासांसाठी का होईना मनोरंजनाची हुकमी पळवाट दिली. त्यामुळे सिनेमा हे आपले लाडके प्रकरण झाले. आपल्या वैविध्यपूर्ण देशात लोकांना एकमेकांना सांगायला काही कमी गोष्टी नव्हत्या, तितकेच वैविध्यपूर्ण टॅलेंटही होते. परिस्थिती कशीही असली तरी सिनेमासाठी नेहमी पोषक वातावरणच राहिले. म्हणूनच आज बॉलीवूड प्रदर्शनाच्या संख्येत हॉलीवूडही दुपटीने मागे टाकत आहे. आज त्यांच्याकडे स्पेशल इफेक्ट्स असेल तर आपल्याकडे सिनेमातील गाणी आहेत. तिकडचा सिनेमा त्यांच्या जीवनाचा आरसा आहे, तर आपले जीवन जणू आपल्या सिनेमाचे सेलिब्रेशन आहे. तिकडे ज्या सिनेमात गाणी असतात त्यांना म्युझिकल म्हटले जाते. कितीही तयारी केली, चांगली स्क्रिप्ट वगैरे असली तरी तिथली कलाकार जेव्हा सिनेमात गाणे म्हणू लागतात तेव्हा ती आपल्या इकडच्या कुठल्याही दुय्यम हिरोहिरोईनपेक्षा कृत्रिमच वाटतात. हे जे आपल्याकडे आहे तसे हॉलीवूडस स्पेशल इफेक्ट्स आहेत.
  आता आपल्या सिनेमांमध्ये स्पेशल इफेक्ट्स इतके अप्रगत का, याची नेमकी कारणे शोधायची झाली तर सर्वात वर तरंगणारे कारण म्हणजे पैसा. त्याखालोखाल दिसणारे कारण म्हणजे वर चर्चा करण्यात आल्याप्रमाणे त्यांच्याकडची प्रगत तांत्रिक प्रगल्भता. पण या दोनीही गोष्टी कमी असूनही इतर बाबींमध्ये आपला सिनेमा वरचढ ठरतोच आहे. मग स्पेशल इफेक्ट्समध्येच मागे का? मुळात गेल्यास कळते की वरवरची सगळी कारणे सोडली तर खोलात जाऊन जे मूलभूत कारण सापडते ते म्हणजे आपला प्रेक्षक वर्ग. तांत्रिक प्रगतीमध्ये कमी पडत असलो तरी आपल्याकडील काही अतिशय प्रतिभाशाली कल्पक कलाकारांच्या अथक चिकाटीने आपली सिनेसृष्टी तरली. उदाहरणार्थ, अमिताभचे तरुणपणीचे सिनेमे पाहा. त्यावेळचे दिग्दर्शन, सिनेमाटोग्राफी इत्यादी बेसिक गोष्टीदेखील बऱ्याचदा प्राथमिक स्वरूपात होत्या. पण तशातही अमिताभसारखे कलाकार जीव ओतून कधी अभ्यासक प्रवृत्तीने, तर शाहरुखसारखे कलाकार आपल्या चार्मने सिनेमातील उणीव भरून काढू लागले. तेव्हा ते सिनेमापेक्षाही मोठे ठरले. हेच कारण आहे आज आपल्या सिनेसृष्टीत हिरो हा कथानक, दिग्दर्शन इत्यादी गोष्टींपेक्षाही मोठा आहे. अभिनेत्यांनी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची नस पकडली आणि मग इतर गोष्टी दुय्यम ठरू लागल्या. आपला सिनेमा आपल्या आवडीच्या हिरोला पडद्यावर दाखवतो या कारणापोटी आजही भारतातील बहुसंख्य समाज थिएटरला जाऊन सिनेमा पाहतो. पण हॉलीवूडमध्ये स्टोरीच नेहमी हिरो राहिली. अभिनेत्याच्या जोरावर एखादा फ्लॉप सिनेमा हिट झाला तरी तो ट्रेंड बनत नाही. कारण जागतिक प्रेक्षक सतत अद्ययावत होत जातो. कुठलाच ट्रेंड बसायला वेळच मिळत नाही. सिनेमाचे मूलभूत उद्देश म्हणजेच ‘एखादी भन्नाट कथा शक्य त्या सवरेत्तम प्रकारे दाखवणे’ हे कायम पाळले जाते. त्यामुळे पूर्ण टीम कथेला न्याय देण्याच्या प्रयत्नात असते. हेच कारण त्यांच्या तांत्रिक प्रगतीचे आणि स्पेशल इफेक्ट्समधील आघाडीचे कारण आहे. आपल्याकडे काय तंत्रज्ञान आहे हे पाहून सिनेमे काढण्यापेक्षा काही ट्रेंडसेटर दिग्दर्शक कथेची गरज म्हणून तशी टेक्नॉलॉजी बनवण्याच्या मागे लागतात. मागील वर्षी आलेला ‘ग्राव्हेटी’ याच कारणामुळे इतिहासात महत्त्वाचा सिनेमा म्हणून ओळखला जाणार आहे.
   या सिनेमात इफेक्ट्स तर पुरेपूर वापरले होतेच. (साहजिकच. स्पेसमध्ये हा सिनेमा घडतो. पण माझ्या एका मैत्रिणीने हा सिनेमा स्पेसमध्ये शूट केलाय ना? चक्क असे विचारले होते. यावरून सिनेमाने ग्राफिक्स क्षेत्रात काय भरारी मारली आहे हे समजावे.) पण अभिनेते ज्या स्पेस सूटमध्ये असतात त्याच्या तोंडावरील काचेवर रिफ्लेक्शन दिसण्यासाठी एक असा सेट बनवण्यात आला होता, ज्याला सर्व बाजूंनी प्रखर एलइडी लाइट्सने बनलेल्या स्क्रीनने वेढलेले होते. त्यांच्या मधोमध अभिनेत्यांना दोऱ्यांनी लटकवले जायचे. (ज्यामुळे ते स्पेसमध्ये तरंगत असल्याचे शूट करता येते. यासाठीही अभिनेत्यांनी पाच महिन्यांचे ट्रेनिंग घेतले होते.) मग सीन शूट करत असताना स्पेशल इफेक्ट्स वापरून बनवलेले अंतरिक्षाचे ग्राफिक्स एलइडी स्क्रीनवर चालवले जायचे. जेणेकरून मग त्या सिनेमातील हलत असणाऱ्या अभिनेत्यांनी स्पेस सूटच्या हेल्मेटच्या काचेवर अगदी योग्य त्याच परावर्तीत प्रतिमा दिसतील. आता हे सगळे करायला शंभरएक माणसे एक्स्ट्रा लागतात. तीही तांत्रिक माहिती असलेली. त्यांचे पगार. हे सगळे करायला जाणारा वेळ. याच सगळ्या गोष्टी जशा तिथे आधीपासून मुबलक आहेत, तशा त्या आपल्याकडे आधीपासून अभावाने आहेत. त्यामुळे आपली सिने इंडस्ट्री विकसितच अशी झाली की, तिला या गोष्टींची गरज भासत नाही. कोरियासारख्या तुलनेने गरीब देशात स्पेशल इफेक्ट्स कल्पकतेने कमी पैशात बनवल्या जातातच की. कारण तिकडे घरोघरी तंत्रज्ञान असल्याने ती प्रेक्षकांचीही गरज बनली.
  आपल्याकडेही प्रेक्षकांची गरज नसली तरी सिने-जागतिकीकरणामुळे स्पेशल इफेक्ट्सची डिमांड मेनस्ट्रीममध्ये येण्याची शक्यता आहे. तसे नाही झाले तरी मल्टीप्लेक्समुळे मिळालेल्या पर्यायांमुळे आताच आपल्याकडे एक स्पेशल इफेक्ट्ससाठी जातीने हॉलीवूड सिनेमे पाहणारा वर्ग तयार झाला आहे. या वर्गाची डिमांड पाहता आपल्याकडेही काही दिग्गज मंडळी रा. वन (शाहरुख), कोई मिल गया-क्रिश (राकेश रोशन ) हा नवीन ट्रेंड कॅश करण्याचा यशस्वी प्रयत्न करून झालेले आहेत. यावर्षी स्पेशल इफेक्ट्ससाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला ‘जल’चे ग्राफिक्स छानच आहेत. किती लोकांना हा सिनेमा माहीत आहे किंवा पाहायचा आहे, हा मुद्दा वेगळा..
.. की हाच खरा या आपल्याकडील दुय्यम स्पेशल इफेक्ट्सच्या प्रश्नामागील मुख्य मुद्दा म्हणायचा!

सौजन्य: युवा  http://www.zoneyuva.com/entertainment/2997

No comments:

Post a Comment